बारामती : आपल्या वर्चस्वाला धक्का लागल्याची भावना मनात निर्माण झाल्याने सहा जणांच्या टोळक्याने एकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार बारामती शहरातील आमराई परिसरात घडल्याचे समोर आले आहे. हल्ल्याच्या आरोपाखाली बारामती शहर पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महेश सुनील खंडागळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोमल राहुल मिसाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, आरती शंकर गव्हाळे, शंकर अशोक गव्हाळे (रा. आमराई, बारामती), अक्षय वाघमोडे, आकाश वाघमोडे, चंदन अशोक गव्हाळे, तन्मय काकडे, (सर्व रा. आंबेडकर वसाहत, बारामती) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तन्मय काकडे, चंदन गव्हाळे, अक्षय वाघमोडे, आकाश वाघमोडे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंदन अशोक गव्हाळे याला महेश सुनील खंडागळे यांनी १५ डिसेंबरला फायटरने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही गव्हाळे याचे समाधान झाले नव्हते. त्याच्या मनात त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागल्याची त्याची भावना निर्माण झाली होती. खंडागळे हे पोलीस कोठडीतून सुटल्यानंतरही गव्हाळे यांच्या भीतीने घरी येत नव्हते.
दरम्यान बुधवारी (ता. ०२) ते त्यांच्या घरी आले. सायंकाळी ते वडील सुनील, आई आशा, भाऊ विनायक, बहीण कोमल मिसाळ, दाजी राहुल मिसाळ यांच्यासह घरी असताना आरोपी गव्हाळे तेथे आले. त्यांनी जुन्या रागातून घरावर दगड-विटा घेत हल्ला केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. खंडागळे यांना त्यांच्या नातेवाईकांनी घरामध्ये लपवून ठेवले.
मात्र चंदन व तन्मय यांनी धारदार हत्याराने महेशचे वडील सुनील यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली. आशा खंडागळे, राहुल मिसाळ यांच्यावरही वार करण्यात आले. या घटनेत सुनील खंडागळे जागीच कोसळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गंभीर स्वरुपाची इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. आशा खंडागळे व राहुल मिसाळ यांना उपचारानंतर सोडण्यात आले.