पुणे : पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून बाप- लेकावर तिघांनी कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील काळेवाडी परिसरातील भारतमाता चौकाजवळील रस्त्यावर घडली आहे. शनिवारी (ता. ०४) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात तीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अभिषेक हौसराव बचाटे (वय-२०,रा. काळेवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अभिषेक बचाटे हे तापकीर चौक, काळेवाडी येथून घरी पायी चालत जात होते. यावेळी अनोळखी तीन व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या पाठीमागून पाण्याने भरलेला पिशवीचा फुगा फेकून मारला. त्यामुळे त्याने मागे फिरुन त्याबाबत आरोपींना जाब विचारला असता त्याचा राग येऊन आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
दरम्यान, बापलेकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तेथे राहत असणारे त्यांचे मामा नितीन प्रभाकर पवार व वडील हौसराव बचाटे हे मुलास वाचविण्यास आले. मात्र, यावेळी आरोपींमधील एका तरुणाने वडील हौसराव यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मुलगा अभिषेक मधे पडला असता, त्याच्यावरही वार करण्यात आले. यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले.