अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे भाकरी मागण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या चिमुकली च्या अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली मधील ऊसाची मोळी पडल्याने मृत्यू झाला. सदरची घटना धकटवाडी गावाच्या हद्दीत घडली.
ऊसाने भरलेल्या दोन ट्रक्टर ट्रालीतील एक ट्राली पलटी होऊन ऊसाच्या मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे ( वय -१२ ) हिचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गायत्री लकी शिंदे ,झिंगाट साजन शिंदे व सजनी अमर काळे ही लहान मुले पोटासाठी भाकरी घेऊन रस्त्याने जात होते. यावेळी चालत धकटवाडी हद्दीमध्ये आले असतानाच ऊसाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १० / ए वाय ८४७९) भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत आलेला दिसल्याने रस्त्याच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, ट्रॉलीमधील ऊस मोळी अंगावर पडल्याने सजनी अमर काळे ही उसाच्या मोळी मध्ये अडकून पडली. तेथील ये- जा करणाऱ्या लोकांनी ऊसाच्या मोळ्या काढून ऊसाच्या खाली अडकून पडलेल्या सजनी काळे हिला वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच ती मृत्यू पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक्टर चालक चौडाप्पा प्रभू पूजारी ( वय -३९ ) कर्नाटक राज्यातील इंडी ता. विजापूर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सदर घटनेचा अधिक तपास हेड कॉ. शांतीलाल ओंबासे करीत आहेत.