पुणे : विमाननगर परिसरात चायनीज विक्रेत्याला दर महिना खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायधीश सत्यनारायण नावंदर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. आरोपीवर येरवडा पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती.
शकील शब्बीर शेख (वय – २३ रा. येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सानी गुलामनबी जोड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शकील शेख याने अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सानी गुलामनबी जोड यांचे गणपती चौक, विमाननगर या ठिकाणी चायनीजचे दुकान आहे. १७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी शकील शेख याने फिर्यादीच्या चायनीजच्या स्टॉलवर जाऊन यास १२०० रुपये घेतले.
याप्रकरणी आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक करून त्याचे विरुद्ध मोक्का कलमचा अंतर्भाव करण्यात आला होता. तसेच आरोपी शकील शेख हा मागील एका वर्षापासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद होता. शेख याने अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत जामिनाचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयात दाखल केला होता. आरोपी याने कुठलाही गुन्हा केलेला नसून, गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला आहे.
पुणे पोलिसाची मोक्का कार्यवाहीमध्ये आकडा वाढवण्याची स्पर्धा लागली असल्याने हा खोटा मोक्काचा गुन्हा आरोपी विरुद्ध दाखल केला आहे, तसेच आरोपीविरुद्ध पोलिसांनी चार्जशीटमध्ये कोणताही प्रथम दर्शनीय पुरावा दाखल केलेला नसल्याने व योग्य तपास केलेला नसल्याने आरोपीस जामिनावर सोडण्यात यावे असा युक्तिवाद अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून विशेष जिल्हा व सत्र न्यायधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टाने आरोपी शकील शेख यास अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे. सदर कामी अॅड. मयूर चौधरी, अॅड. भाग्यश्री महाळूनकर, अॅड. अक्षय बडवे यांनी मदत केली.