पुणे : येथील जंगली महाराज रोड परिसरातील २०१२ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला असे हायकोर्टाने जामीन मंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला सन २०१३ साली अटक करण्यात आले होती.
पुण्यातील जंगली महाराज रोडवर १ ऑगस्ट २०१२ रोजी पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नव्हता. दहशतवाद्यांकडून हे बॉम्ब तयार करण्यात त्रुटी रहिल्याने मोठी दुर्घटना टळली होती.
मात्र, या स्फोटांमुळे डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. अनेकांना सुरुवातीला या स्फोटांचे गांभीर्य लक्षात आले नाही, मात्र काही मिनिटांतच काही अंतरावर ठेवण्यात आलेले पाच बॉम्ब सलग फुटल्याने मोठा हल्ला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुण्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. स्फोट न झालेला बॉम्बही निकामी करण्यात आला होते.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार, अशी त्यांची नावे आहेत. भारतीय दंड संहिता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा( MCOCA), स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.