हिंगोली : औंढा नागनाथ पोलिसांनी १.१४ कोटी रुपायांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे . यामध्ये औरंगाबाद येथील एका महिलेसह खामगावच्या तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी फरार दोघांचा शोध सुरु केला असून १० लाख रुपये किमतीच्या खऱ्या नोटांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी औढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज, राहुल चंदुसिंग ठाकूर ( सर्व रा. खामगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड व लातुर येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, विलास वडजे, सोमनाथ दापके, सुनील जगवार या पाच जणांसोबत ओळख होती. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. त्यांनी महिलेस १ लाख रुपयांचे ३ लाख रुपये करुन देतो असे अमिष दाखविले. महिलेने त्यासाठी १० लाख रुपये सोबत घेऊन बुधवारी थेट नांदेड गाठले. त्या ठिकाणी उतरल्यानंतर महिला एका वाहनाने औंढा नागनाथकडे निघाली होते. तर ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खामगाव येथून पाच जण गाडीने औंढा नागनाथकडे आले होते.
औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या आवारात महिलेने जवळील १० लाखांच्या नोटा आरोपींना दिल्या. त्या बदल्यास गाडीतील व्यक्तींनी ४० लाखांच्या नोटांची बॅग महिलेकडे दिली. त्यानंतर ते फरार झाले.
दरम्यान, औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयासमोर वाहन थांबवून त्यांनी नोटा मोजण्यास सुरवात केली. यावेळी महिला वाहनाबाहेरच थांबली होती. याचवेळी गस्तीवर असलेल्या औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वानाथ झुंजारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, रवी हरकाळ, अमोल चव्हाण यांनी महिलेस हटकले. पोलिसांना पाहताच महिलेसोबतच वाहनातील पाच जणांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी महिलेकडे विचारणा केली असता तिने आपली फसवणुक झाल्याचे सांगितले व तिला देण्यात आलेल्या ४० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटांची बॅग दाखवली.
नंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व प्रकरणाची माहिती पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांना दिली. त्यानंतर मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची नाकेबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या नाकेबंदीमध्ये पथकाने वाहनासह ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज, राहुल चंदुसिंग ठाकूर ( सर्व रा. खामगाव) यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, व्हिडीओ कॉलिंगवरून त्यांची ओळख पटल्यानंतर खामगाव पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात ७५ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा व बनावट सोने सापडले. त्यानंतर आज पहाटेच औढा पोलिसांच्या पथकाने खामगाव येथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणात नऊ जणांची चौकशी सुरु असून औढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. उर्वरीत दोघांसह १० लाख रुपयांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.