हडपसर : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता आरोपीने बाथरूममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अमोल राजू क्षीरसागर (वय २५, रा. कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल राजू क्षीरसागर याला बलात्काराच्या घटनेमध्ये
वानवडी पोलिसांनी अटक केली होती. तसेच आरोपीला हडपसर पोलिस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.
कोठडीत आरोपीने गजावर आणि भिंतीवर डोके आपटले. त्यामध्ये तो जखमी झाल्यावर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने वॉशरूमला जात असल्याचे सांगून आतमध्ये खिडकीतील काच काढून गळ्यावर मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.