पुणे : लोणी काळभोर, हडपसर व जिल्हा पोलीस ठाण्याच्या ह्द्दीतुन २० हून अधिक मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला व त्या मोटारसायकली विकत घेणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखे युनिट पाचच्या पथकाने सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे.
अजय रमेशराव शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, म्हस्कोबा चौक दौंड, मूळ वरोरा, (विदर्भ), व यल्लाप्पा कृष्णात बेळे (वय-३४ रा. नंदुर डोणगाव, ता. उत्तर सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत होते. यावेळी अजय शेंडे याला संशयितरित्या आढळून आल्याने त्याला पकडले. त्या वेळी त्याच्याकडे बनावट नंबरप्लेटची दुचाकी मिळून आली. त्याच्याकडे अधिक चोइउकशि केली असता त्याने पुणे जिल्हा व इतर परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीची वाहने सोलापूर येथील एका मित्राला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने यल्लाप्पा वेळ याला ताब्यात घेतले.
दरम्यान, दोन्ही आरोपींकडून हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अकरा गुन्हयांबरोबरच इतर ठिकाणचे असे मिळून २० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाने पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर, कर्मचारी रमेश सावळे, दया शेगर, शशिकांत नाळे, अमित कावळे यांच्या पथकाने केली.