लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी शैक्षणीक संकुलाच्या पाठीमागे मुळा-मुठानदीच्या पात्रालगत चक्क ड्रेनिजच्या पाण्यातून हातभट्टी दारू बनवीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांची तगडी यंत्रणा असतानाही अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अवैध धंदे हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत. असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
लोणी काळभोर, सोरतापवाडी, शिंदवणे उरुळी कांचनसह परिसरात हातभट्टीची मुबलक दारू बनवली जाते. हातभट्टीमध्ये रसायन मिसळून दारू काढली जाते. त्यामुळे पिणाऱ्याच्या जीवाला धोकाही होतो. इतर मद्यांच्या तुलनेत हि हातभट्टीची दारू कमी किमतीत मिळते. त्यामुळे कष्टमय व हलाकीचे जीवन जगणारे आर्थिक परिस्थितीमुळे गरीब असणारा समाज या हातभट्टीच्या आहारी गेला आहे. परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
पूर्व हवेलीत अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाणे हे ग्रामीण पोलीस दलातून शहर पोलीस दलात समाविष्ठ होऊन दीड वर्ष होत आले आहे. परंतु अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे. या बदलाने या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायांवर कारवाई होऊन आळा बसेल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे लोणी काळभोर परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळे खुलेआम सुरु असताना ही लोणी काळभोर पोलीस नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.