पुणे : प्रतिस्पर्धा गटातील मित्राला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मार्केट यार्ड परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे.
फहिम फिरोज शेख (रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ अशोक सदाफुले (वय २२, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सदाफुले यांचा मित्र काळू घोलप याच्याशी आरोपी शेख याचा वाद झाला होता. घोलप याच्या वाढदिवसानिमित्त सदाफुले याने समाजमाध्मयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान, याचा राग मनात धरून आरोपी शेख हा सदाफुले याच्यावर चिडला होता. याच रागातून आरोपी शेख याने सदाफुलेला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. ‘मी आंबेडकरनगरचा दादा आहे’, अशी धमकी देऊन त्याने परिसरात दहशत माजविली. आरोपी शेख याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे करीत आहेत.