दिनेश सोनवणे
दौंड : तालुक्यातील चौफुला जवळ असणाऱ्या देऊळगाव गाडा येथे शेतजमिनीच्या वादातून दोन इसमांनी एक दुसऱ्यावर तलवार आणि कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. हाणामारी करणाऱ्या या दोघांवर एक दुसऱ्याच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी 307 आणि आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार दि. 02 जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास देऊळगाव गाडा येथे हि घटना घडली आहे. यातील प्रथम फिर्यादी दुर्गा गोविंद शिंदे ( रा. दापोडी, कलानगर, ता. दौंड ) हा जेसीबी घेऊन देऊळगाव गाडा येथील शेतजमीन 303 मध्ये जमीन लेवल आणि झुडूपे काढत असताना तेथे दुसरा फिर्यादी सावता ज्योतिबा डेंबळकर ( रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड ) हा तेथे आला आणि त्या दोघांमध्ये या जमिनीच्या दुरुस्तीवरून वाद सुरु झाला .
यावेळी सावता डेंबळकर याने हातातील तलवार आणि कोयत्याच्या सहाय्याने दुर्गा शिंदे यावर हल्ला केला असल्याचे दुर्गा शिंदे याने फिर्यादित म्हटले असून दुर्गा शिंदे याने हातातील कोयत्याने सावता डेंबळकर याच्यावर हल्ला करून जखमी केले असल्याचे सावता डेंबळकर याने आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
वरील दोन्ही इसमांवर यवत पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे आणि शस्त्र कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि वाबळे करीत आहेत.