अहमदनगर : लग्न समारंभात भाजपचे नेते अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख ओंकार सातपुते यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर सातपुतेंच्या हॉटेलवर कर्डिलेंच्या मुलाने आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन दगडफेक केली. या दगडफेकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉटेलमध्ये आलेले काही ग्राहकही जखमी झाले आहेत.
याप्रकरणी विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिलेसह अज्ञात ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राजकीय राड्यामुळे रात्री काही काळ नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील एक गावात एका नेत्याकडील लग्न समारंभाला राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती. तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते हेही उपस्थित होते. अहमदनगरधील नेहमीच्या पद्धतीने खुन्नस देण्यावरून त्यांच्यात वाद झाला.
रात्री कर्डीले गटाच्या समर्थकांनी वाहनांतून नगर शहरातील केडगावामध्ये येत सातपुते यांच्या हॉटेल रंगोलीवर दगडफेक केली. त्यांना सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रतिउत्तर दिल्याने गटाकडून दगडफेक झाली. या प्रकाराच्या निषधार्थ आणि कारवाईच्या मागणीसाठी सातपुते समर्थक म्हणजेच शिंदे गटाचे कार्यकर्ते नगर – पुणे महामार्गावर ठाण मांडून बसले. त्यावरूनही पुन्हा दगडफेक झाली. आधी हॉटेलचे आणि नंतर अन्य वाहनांचे नुकसान झाले.
दगडफेकीमुळे हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, नगर तालुका, एमआयडीसी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. तोपर्यंत कर्डिले गटाचे समर्थक निघून गेले होते. सातपुते गटाच्या समर्थकांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत रस्त्यावर बसून राहिले. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात यावे, लागेल असे पोलिस सांगत होते. मात्र, सुरुवातीला कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. शेवटी रात्री उशिरा सर्वजण तेथून चालतच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आले. त्यानंतर वातावरण निवळले आणि वाहतूक सुरळीत झाली.