पुणे : कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी सरकारी विद्युत ठेकेदाराला ५० हजार रुपयांची लाच मागून, ती लाच स्वीकारताना महावितरणाच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाणेर येथील महावितरण कार्यालयातून शुक्रवारी (ता.०१) रंगेहाथ पकडले.
रविंद्र नानासाहेब कानडे (वय-३७, पद सहायक अभियंता (वर्ग-२) महावितरण कार्यालय, उपकेंद्र बाणेर, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ५७ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार असून, त्यांना आर. एम. सी. प्लांटसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठाचा ठेका मिळाला होता. सदरचे काम शासकीय योजना १.३ टक्के तत्वाच्या (MSEDCL) नियमानुसार पूर्ण केले असून, या कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आरोपी रविंद्र कानडे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी रविंद्र कानडे यांनी तक्रारदार यांच्याकडे शासकीय योजना १.३ टक्के तत्वाच्या (MSEDCL) नियमानुसार पूर्ण केले असून, सदर कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदार यांच्याकडून ती लाच स्विकारल्यावर आरोपी रविंद्र कानडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत