पुणे : दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार असल्याचे सांगून सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाच्या दुकानातील व्यवस्थापकाने 5 किलो सोने व 50 किलो चांदी आणि रोकड असा 2 कोटी 27 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी ज्योतीरादित्य उर्फ यश मोकाशी यांनी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी (वय-35 रा. लोणी काळभोर ) विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च 2022 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली आहे. फिर्यादी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोड हडपसर येथील शिवनेरी बिल्डिंगमध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाचे सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरु केले होते. त्यात नातेवाईक आणि मित्रांकडून 5 किलो सोने, 85 किलो चांदी अशी भांडवली गुंतवणूक केली होती. या दुकानात व्यवस्थापक म्हणून विनोद कुलकर्णी याची नेमणूक केली होती.
दरम्यान, फिर्यादी पुढचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला निघून गेले. त्यामुळे दुकानाची जबाबदारी व्यवस्थापक कुलकर्णी यांच्यावर आली. त्याकाळात व्यवस्थापकाने दुकानात सोने-चांदीची अफरातफर करण्यास सुरूवात केली. कालांतराने मोकाशी हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुकानाचे कामकाज पाहिले असता दुकानात सोने व चांदी कमी असल्याचे त्यांना जाणवले.
पावणे तीन किलो सोने व 50 किलो चांदी कमी असल्याचे समजताच मोकाशी यांनी ही बाब वडिल राजेंद्र मोकाशी यांना सांगितली. वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत कुलकर्णी यांच्याकडे चौकशी केली असता त्याने 7 फेब्रुवारी रोजी सर्व सोने परत देतो व हिशोब पूर्ण करतो, असे सांगून निघून गेला.
यानंतर 8 फेब्रुवारी रोजी व्यवस्थापक कुलकर्णी याने सकाळी दहाच्या सुमारास दुकानातील कामगाराला फोन करुन दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार असल्याचे सांगितले. तसेच मालकाला हिशोब द्यायचा आहे, त्यासाठी सोने-चांदी तयार ठेव असे सांगितले. यानंतर काही वेळाने एक गाडी आली. कामगाराने दुकानातील सर्व सोने-चांदी त्याला दिली आणि सांगितल्या प्रमाणे दुकान बंद केले. व्यवस्थापक कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आलेले पाच किलो सोने, 85 किलो चांदी आणि रोख रक्कम अशी 2 कोटी 27 लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.