पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच चोरट्यांनी आता मंदिराकडे आपला मोर्चा वळविला आहे. काळूबाई मंदिरातून तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घराचे कुलुप उचकटून आत प्रवेश करत ही चोरी केली आहे. मंदिरातील या चोरीच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मंदिरातील या चोरीप्रकरणी राजेश गद्रे (वय 43, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे आई-वडील अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे वसाहतीत राहायला आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे वसाहतीतील गद्रे यांच्या घरात श्री काळूबाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात चोरट्यांनी घराचे कुलुप उचकटून आत प्रवेश केला व अडीच लाखांचे सोन्याचे दागिने तसेच गल्ल्यातील 25 हजारांची रोकड पळविली. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.