पुणे : एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन सर्च करुन बँकेचा नंबरवर संपर्क साधल्यावर सायबर चोरट्याने ऑनलाईन २ लाख रुपये काढून घेऊन बँक खाते रिकामे केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ५५ वर्षाच्या नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्ड टाकल्यानंतरही पैसे न आल्याने त्यांनी गुगलवरुन नंबर घेतला. तो बँकेच्या नावाने सायबर चोरट्यांनी टाकलेला हेल्पलाईन नंबर होता. त्यावर संपर्क साधल्यावर मोबाईलधारकाने आपण बँकेचा अधिकारी असल्याचे भासवले.
त्यानंतर फिर्यादीला एनीडेक्स हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ते डाऊनलोड केल्यावर त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरट्याने घेऊन त्यांच्या एस बी आय बँक खात्यावरुन ऑनलाईन पद्धतीने २ लाख रुपयांचे व्यवहार करुन फसवणूक केली.
याप्रकणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्या चौकशी नंतर आता विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.