पुणे : चालू वर्षात सायबर चोरट्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ११४ घरमालकांना गंडा घातल्याची माहिती पोलिस दप्तरीत नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना खबरदारी घेण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अरलकर (रा. भूमकर चौक, वाकड) यांनी फ्लॅट भाड्याने देण्यासाठी 99 एकर्स या वेबसाईटवर जाहिरात दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने संपर्क साधून त्यांना फ्लॅट पसंत असल्याचे सांगितले. तसेच, चोरट्याने त्यांना एक क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास भाग पाडले.
त्यानुसार, तक्रारदार केतन यांनी क्यूआर कोड स्कॅन केला असता त्यांच्या बँक खात्यातील एक लाख ८० हजार रुपये परस्पर दुसर्या बँक खात्यावर हस्तांतरित झाले. अचानक बँक खात्यावरील पैसे कमी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केतन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अशा प्रकारे केली जाते फसवणूक
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली जाहिरात पाहून सायबर चोरटे घरमालकाला फोन करतात. आपल्याला घर भाड्याने हवे आहे, असे सांगून घरमालकांकडून आणखी तपशील मागवून घेतात. त्यानंतर बुकिंग अमाउंट ऑनलाइन पाठवतो, असा मेसेज करून घरमालकाला पैसे आले का, अशी वारंवार विचारणा केली जाते. थोड्याच वेळात काही तांत्रिक अडचण आल्याचे सांगून पैसे जात नसल्याचे सांगितले जाते, त्यानंतर घरमालकाच्या मोबाईलवर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास भाग पाडले जाते. घरमालकांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर काही वेळातच घरमालकाच्या बँक खात्यावरून आपोआप दुसर्या बँक खात्यावर पैसे हस्तांतरित होतात.
लष्करात असल्याची बतावणी करून फसवणूक
सायबर चोरटे फोनवर आपण भारतीय लष्करी सेवेत असल्याचे घरमालकाला सांगतात. त्यानंतर घरमालकाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर बनावट ओळखपत्रदेखील पाठवतात. एकदा घर मालकांचा विश्वास संपादन झाला की, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्यासाठी भाग पाडून फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.