Arrested | सोलापूर : बाप आणि लेकीच्या प्रेमापुढे सर्वकाही फिके असे बोलले जाते. त्यामुळे बापावर मुलापेक्षा लेकीचा जास्त जीव आहे, असे छातीठोक पणे बोलले जाते. पण, करमाळा तालुक्यातील एका बापाने स्वत:च्याच १२ वर्षीय लेकीला एकदा नव्हे तर चारवेळा पुण्यातील कला केंद्रांना विकून सहा लाख रुपये घेतले. पुन्हा त्याने सोलापुरातील चार कला केंद्रांना तिला अडीच लाख रुपयाला विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने जोडभावी पेठ पोलिसांत धाव घेतली आणि त्या नराधम बापाचे पितळ उघडे पडले.
कोरोना काळात दोन वर्षांपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते, घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. अशावेळी हातावरील पोट असलेल्यांना किमान दोनवेळचे जेवण देखील मिळत नव्हते, अशी स्थिती होती. अनेकांच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढत होता, त्या चिंतेतून काहींनी जगाचा निरोप देखील घेतला. तर काहींनी ‘हे पण दिवस जातील’ अशी आशा उराशी बाळगून कोरोनाचे संकटाचा सामना केला.
लॉकडाउनमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी कला केंद्रात…
पण, करमाळा तालुक्यातील एका नराधम बापाने मुलीचे वय शिक्षणाचे, खेळण्या-बागडण्याचे असतानाही तिला चक्क पुण्यातील वेगवेगळ्या कला केंद्रांना विकले. लॉकडाउनमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी पैशांची अडचण असल्याने तिला कला केंद्रात पाठविल्याचे त्या बापाने पोलिसांना सांगितले.
मात्र, वस्तुस्थिती खूपच वेगळी असल्याचे आता समोर आले आहे. पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या बापाला बेड्या ठोकल्या. त्याच्यासोबत मध्यस्थी महिलेला देखील जेरबंद केले.
न्यायालयाने त्यांना आता २६ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी कला केंद्राच्या तावडीतून सोडवले. सध्या वैद्यकीय अहवालासाठी ती श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) दाखल आहे.