पुणे : गुगल सर्चवरून पुण्यातील हायप्रोफाईल सोसायटयांची माहिती घेऊन घरफोडी करणाऱ्या रॉबिन हुडसह तीन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
टोळीचा म्होरक्या मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड (रा. गाव जोगिया, पो. गाढा, थाना पुपरी, जि. सीतामढी, बिहार), शमीम शेख (मुळ रा. बिहार), अब्रार शेख आणि राजु म्हात्रे (दोघे रा. धारावी, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर त्यांचे साथीदार सुनिल यादव, पुनित यादव आणि राजेश यादव (तिघे रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) हे तामिळनाडू पोलिसांच्या कस्टडीत आहेत. तर मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड याच्याविरूध्द उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडूमध्ये गँगस्टर अॅक्ट, आर्म अॅक्ट आणि घरफोडीचे असे एकुण तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाणेर रोडवरील सिंध सोसायटीमधील एका फ्लॅटचा खिडकीचा कोयंडा उचकटून १० फेब्रुवारीला घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घरातील कपाटातील परदेशी बनावटीचे पिस्तुल, १२ जिवंत काडतुसे, ३ किंमती घडयाळे, ४ तोळे वजनाची चेन आणि २ लाख रूपये चोरून नेले होते. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या.
गुन्हे शाखेचे पोलीस सदर गुन्हयाचा तपास करीत असताना, आरोपींनी चोरी करण्यासाठी बनावट नंबर प्लेट लावून जग्वार कारचा वापर केल्याचे समोर आले. पोलिसांनी तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना पुणे-नाशिक मार्गावरील एका फुटेजममध्ये एल जग्वार कारचा खरा नंबर प्राप्त झाला. त्यावरून पोलिसांनी सखोल तपासास सुरूवात केली. त्यानंतर टोळीचा म्होरक्या रॉबीन हुड आणि त्याच्या साथीदारांनी सिंध सोसायटीमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी जालंधरमध्ये बिगारी कामगारांचा वेश परिधान करून रॉबीन हुडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली जग्वार कार, चोरीचे पिस्तुल आणि सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपी रॉबीन हुड हा चोरलेली किंमती घडयाळे त्याचा मित्र शमीम शेख (मुंबई) याला विक्रीसाठी देत होता अशी माहिती समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि त्याच्या पथकास मुंबईला रवाना केले.
दरम्यान, आरोपी रॉबीन हुड हा चोरी केलेल्या ऐवजाची विक्री करून मिळालेल्या पैशांमध्ये समाजिक कार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे काही व्हिडीओ देखील युटयूबवर पहावयास मिळतात. त्याने चोरीच्या पैशातून काही गावांचे रस्ते केले आहेत तर काही गरीब मुलींच्या विवाहास आर्थिक मदत केली आहे. रॉबीन हुड याला पोलिसांनी नुकताच जालंधर येथून पुण्यात आणले आहे. त्याच्याकडे पोलीस सखोल तपास करीत आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर , गणेश माने, अजय वाघमारे , सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, नरेंद्र पाटील , पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव , पोलिस अंमलदार विजय गुरव, अस्लम आत्तार, शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, सारस साळवी, हरीष मोरे, प्रविण भालचिम, राजेंद्र लांडगे, विनोद महाजन, अशोक शेलार, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, वैभव रणपिसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.