पुणे : लोन ॲप” फसवणूक टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत (मोक्का) कारवाई करून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कांतर्गत कारवाईचे शतक पूर्ण केले आहे.
टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापुर (टोळी प्रमुख), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय २९, रा. विजापुर रोड, सोलापुर), श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापुर, सॅम्युअल संपत कुमार (वय ४० , डिकोजा रोड बेलातुर बंगलोर, कर्नाटक ), सय्यद अकिब पाशा ( वय २३, वर्षे रा. बेंगलोर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेग ( वय २२, रा.बेंगलोर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय ४२, रा. कोझीकोड अरुर केरळ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२, रा. पडघरा, केरळ) अशी “मोक्कांतर्गत” कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “लोन ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यास भाग पाडून लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांवर “मोक्का”नुसार झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. या वर्षात गुप्ता यांनी ३७ वी मोक्क्यांतर्गत कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख धीरज पुणेकर याच्यासह आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फसवणुक केली. टोळीतील इतर आठ साथीदार यांचे आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे शहरातील बेकायदेशिर मार्गाने हिंसाचाराचा वापर करून मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी, खून बलात्कार, दरोडा व सार्वजनिक उपद्रव करणे आणि वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे. घातक हत्यारे विनापरवाना जवळ बाळगून दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे टोळी युध्दाला वचक बसल्याने शहरातील गुन्हेगारी टोळ्या कारागृहाची हवा खात आहे.
यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, लोन ॲप द्वारे लोकांना त्रास देण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू होते. त्यामुळे दोन जणांनी आत्महत्या केल्या, तर एक खुनाची घटना देखील घडली. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांना कारवाई करून हे सर्व प्रकरण उघडकीस आणले. त्याच बरोबर हे प्रकरण महाराष्ट्रासह देशभरातील लोकांना फसवित असल्याचे उघड झाले, त्यांचे धागेदोरे अन्य देशांतही आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने संबंधित टोळी विरुद्ध कडक कारवाई केली आहे. तसेच सायबर गुन्ह्यात पहिल्यांदाच “मोका” नुसार कारवाई केली आहे.