शिरूर : न्हावरे (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील आयुका पेट्रोल पंपावरील कार्यालयावर सोमवारी (ता. १४) मध्यरात्री अनोळखी सहा इसमांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून मोबाईलसह १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली आहे. शिरूर शहरात चार दिवसांपुर्वी पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच हि घटना घडल्याने शिरुर परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत शेरोसिंग उर्फ बंटी भगवानदास कशब (वय – २३ रा. आयुका पेट्रोल पंप, न्हावरे, ता. शिरूर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, अज्ञात सहा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला असून शिरूरचे उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी व शिरूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून शिरूर पोलीस अधिक तपास करत आहे.
अगदी चार दिवसाच्या अंतरात कोयत्याचा धाक दाखवून झालेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली असून तालुक्यातील पेट्रोल पंपचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.