पुणे : माथाडीच्या नावाने व्यावसायिकांकडे अडवणूक करुन खंडणी मागितल्याप्रकरणी रवी ससाणेवर आणखी एक गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा विमाननगर येथील फिनीक्स मॉलमध्ये ६ डिसेबर २०२२ पासून ३१ जानेवारी २०२३ यादरम्यान घडला आहे.
रवींद्र ऊर्फ रवि जयप्रकाश ससाणे (रा. चंदननगर) आणि त्याचा साथीदार मंगल सातपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पूनावळे येथील एका ३३ वर्षाच्या व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी ससाणे हा फिनिक्स मॉलमध्ये माल घेऊन येणार्या व्यावसायिकांची अडवणूक करुन त्यांना तुमचा माल खाली करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगून धमकावुन त्यांच्याकडून लाखो रुपये वसुल करीत आला आहे. विमानतळ पोलिसांनी ससाणे याला चार वर्षापूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये अटक केली होती. जामीनावर सुटल्यावर ससाणे हा पुन्हा माथाडींच्या नावाने व्यावसायिकांकडून खंडणी वसुल करीत होता.
दरम्यान, एका व्यावसायिकाला फ्लोअरींगचे फरशी बसविण्याचे काम मिळाले होते. त्यासाठी कोची येथून फरशा घेऊन आलेला ट्रक ससाणे व त्याच्या साथीदारांनी अडवला. फरशा खाली करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडून १ लाख २४ हजार रुपये घेतले होते.
त्यानंतर पुनावळे येथील व्यवसायिक फिनीक्स मॉलमधील एका कंपनीचे अंतर्गत नुतनीकरणाचे काम करत होता. त्या कामासाठी पिंपरी येथून प्लायवूडचा भरलेला ट्रक ६ डिसेबर २०२२ रोजी फिनिक्स मॉलमध्ये आला होता. त्यावेळी ससाणे व त्याच्या साथीदारांनी हा ट्रक खाली करुन न देता अडवून ८ लाख रुपयांची खंडणी मागितली.तडजोडीअंती साडेचार लाखांची मागणी केली. व फिर्यादी यांच्याकडून चेकद्वारे २ लाख रुपये घेतले.
आरोपी ससाणे हा उर्वरीत अडीच लाख रुपये मागून फिर्यादीला भेटत होता. तसेच फोन करुन पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देत होता. ससाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतले. या तक्रारीही दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सूचना दिल्या़ त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.