पुणे : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ६० ते ७० जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय-२६, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द, पुणे) यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रासह तेलंगाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. आसाममध्ये पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतलं. तर तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातही एनआयएने या महिन्याच्या सुरवातीला जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले होते.
दरम्यान, देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. नाशिकमध्येही पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोंढव्यातील पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकत काही साहित्य जप्त करण्यात आले. आत्तापर्यंत एनआयए, ईडी आणि एटीएसने कारवाई करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.