पुणे : जातीचे प्रमाणपत्र लवकर काढून देण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना पिंपरी चिंचवड नगरविकास प्राधिकरणाच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पुणे एसीबीच्या पथकाने गुरुवारी (ता.२) निगडी येथील नागरी सुविधा केंद्रात केली आहे.
शैलेश अकांबरी बासुटकर (वय.४१) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांच्या दोन लहान बहिणींचे जातीचे दाखले लवकर देण्यासाठी शैलेश बासुटकर याने चार हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांन लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि गुरुवारी (ता.२) पडताळणी केली असता शैलेश बासुटकर याने चार हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीच्या पथकाने नागरी सुविधा केंद्रात सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून लाच घेताना शैलेश बासुटकर याला रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, महिला पोलीस हवालदार पौर्णिमा साका, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माने, चालक जाधव यांच्या पथकाने केली.