पुणे : काळेवाडी येथील विजयनगर परिसरात ९ किलो गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका वृद्ध तस्काराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (ता.२१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
जवाहर अर्जुनदास रामनानी (वय-६६, रा. विजयनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ८ किलो ७२८ ग्रॅम वजनाचा सुमारे सव्वा लाखांचा रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवाहर याने विक्रीसाठी गांजा आणला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून आरोपी जवाहर यास ताब्यात घेतले.
आरोपीने भैरन बिनदाडी (रा. ओडिसा) याच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार भैरन बिनदाडी याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.