पुणे : नवीन उद्योगाचा प्रस्ताव बँकेकडे शिफारशीसह पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षकाला शुक्रवारी (ता.१३) रंगेहाथ पकडले आहे.
चंद्रभान परशुराम गोहाड (वय- ५७, पद उद्योग निरीक्षक (वर्ग-३) जिल्हा उद्योग केंद्र, शिवाजीनगर, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत खिळे निर्मिती उद्योगाकरीता पुणे जिल्हा उद्योग कार्यालयात अर्ज केला होता. सदरचा प्रस्ताव बँकेकडे शिफारशीसह पाठविण्याकरीता लोकसेवक चंद्रभान परशुराम गोहाड यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लोकसेवक चंद्रभान परशुराम गोहाड यांनी लाचेची मागणी करून, सुरवातीस रोख ५०० रुपये, फोन पे अॅप वरुन १००० रुपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. तसेच शुक्रवारी (ता.१३) तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी लोकसेवक चंद्रभान गोहाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास पुढील दुरध्वनी क्रमांकवर ०२० – २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ या संपर्क साधण्याचे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.