पुणे : अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वारजे (पुणे) परिसरात घडली आहे. परंतु, सुदैवाने मुलीने प्रसंगावधान दाखवून आरोपीला धक्का देऊन पळ काढल्याने सदर प्रकार टळला आहे.
याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीप राय असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय विद्यार्थिनी वारजे परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर आरोपी राय शाळेसमोर असलेल्या एका चहा विक्री दुकानात काम करतो. शाळा सकाळी साडेसातला भरते.
नेहमीप्रमाणे मुलगी बसमधून शाळेत आली होती. शाळेचा सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी गेला होता. तेव्हा आरोपी राय मुलीजवळ आला. आणि चहा प्यायला चल, असे म्हणून मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मुलीने आरडाओरडा केला व मुलीने प्रसंगावधान राखून आरोपीचा हात झटकला. याचवेळी चहा पिऊन शाळेत निघालेल्या सुरक्षारक्षकाने आणि एका दुचाकीस्वाराने हा प्रकार पाहिला. त्यानंतर दुचाकीस्वाराने रायला पकडले. तेव्हा आरोपी तेथून पसार झाला.
दरम्यान, मुलगी शाळेत परतली. त्यानंतर तिने वरील सर्व प्रकार वर्गशिक्षकांना सांगितला. त्यांनी तातडीने हा प्रकार मुलीच्या आईला सांगितला. मुलीच्या आईने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानंतर आरोपी संजीप राय यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.