उरुळी कांचन, (पुणे) : बनावट ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका आरोपीला सोलापूर स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी एकूण चौघांना ताब्यात घेतले आहे.
पप्पू भारत पवार (वय- ३०) असे उरुळी कांचन येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर हर्षल शिवाजी लोकरे (वय- २०), सुभाष दिगंबर काळे (वय- ३६), प्रभाकर उर्फ गणेश सदाशिव शिंदे (वय – ३८) अशी आणखी तिघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर, नोटा व इतर साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे मागील आठ दिवसापूर्वी महाविद्यालयीन तरुणाला अटक करून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक तपास करून त्यांच्या टोळीतील आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी, व एक व्यवसाय करण्यासाठी हा बनावट नोटांचा उद्योग सुरू केल्याच्या माहिती पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
पप्पू पवार हा डीटीपीमध्ये तरबेज होता. त्याने उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एक भाड्याने खोली घेतली होती. व याच भाड्याने घेतलेल्या खोलीत जवळपास ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्या. पप्पूने करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी आर्यन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली होती. अनेक विद्यार्थ्यांना येथून त्याने संगणकाचे धडे दिले. चार महिन्यांपूर्वी पप्पू पवार, हर्षल लोकरे, सुभाष काळे, प्रभाकर शिंदे हे एकत्र आले आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्लॅनिंग केलं. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता, म्हणून त्यांनी बनावट नोटा छापून पैसे जमा करण्याचा डाव आखला.
हुबेहूब ५०० च्या नोटा छापल्यानंतर वरील चौघेहि ग्राहक शोधत होते. त्यावेळी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब बनावट नोटा घेऊन येणाऱ्यांवर पाळत ठेवली. ३ डिसेंबर रोजी हर्षल लोकरे यास ताब्यात घेऊन ५०० रुपयांच्या ४९३ बनावट नोटा जप्त केल्या. त्याला खाक्या दाखवताच हर्षलने पोपटासारखी माहिती दिली. त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष काळे याला टेंभूर्णी येथे महामार्गावर ५०० रुपयांच्या ५८० नोटा जप्त केल्या.
दरम्यान, प्रभाकर उर्फ गणेश शिंदे याला अटक करून ५०० रुपयांच्या १०० बनावट नोटा जप्त केल्या. अशा प्रकारे पोलिसांनी ५ लाख ८६ हजारांच्या बनावट नोटा जप्त करून पोलीस कोठडीत रवानगी केली. हुबेहूब बनावट नोटा छापणाऱ्या पप्पू पवार याला उरुळी कांचन येथून अटक केले व संगणक, प्रिंटर व इतर साहित्य जप्त केले. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक धंनजय पोरे यांनी हि कामगिरी केली आहे.