पुणे : घरात भरून ठेवलेल्या बादलीत खेळत असताना १ वर्षाच्या मुलाचा २० लिटर पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील थेरगाव परिसरात गुरुवारी (ता. ०२) दुपारी हि घटना घडली आहे. या घटनेने थेरगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोहम्मद फैजल तारीख खान असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारीख खान (वय- २९) हे उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असून कामानिमित्त ते पुण्यातील थेरगाव परिसरात राहतात. थेरगाव परिसरात हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. या ठिकाणी ते काचा बनवण्याचे काम करतात. तसेच त्यांची पत्नी जोहरूबी खान (वय २५ वर्ष) या गृहिणी आहेत.
गुरुवारी दुपारी मुलांसोबत घरात झोपले होते. सर्वजण गाढ झोपेत असताना त्यांचा धाकटा चिमुकला फैजल हा झोपतून उठला आणि रांगत रांगत वीस लिटर भरून ठेवलेल्या बादली जवळ जाऊन पाण्यात खेळू लागला. मात्र खेळताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.
दरम्यान, मुलगा कुठे गेला, हे पाहण्यासाठी आई जोहारुब झोपेतून उठल्या, त्यावेळी त्यांना फैजल हा पाण्याच्या बादलीत पडलेला दिसला. त्यांनी जोरात आवाज देऊन पतीला झोपेतून उठवले. त्यानंतर त्यांनी फैजलला दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगतिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.