योगेश पडवळ
Ambegaon News : सविंदणे : लाखणगाव (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत चारंग बाबा गायरानाच्या समोर बेल्हे-जेजुरी मार्गावर अल्टो कारने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ६) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत दत्तात्रय दौंड यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रसिक रंगनाथ दौंड (वय १९, रा. लाखनगाव, दौंडवस्ती, ता. आंबेगाव) हा सकाळी त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून (क्र. एम. एच. १४ सीक्यू ९८३१) जात होता. या वेळी बेल्हे-जेजुरी महामार्गावरून पाठीमागून येणाऱ्या अल्टो कारने (क्र. एम.एच. १० के.एस. ८०८७) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील रसिक याच्या हाता-पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अल्टोचालक सागर भिमाजी साळवे (रा. साकुर मांडवे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक सागाडे करत आहेत.
रसिक दौंड याच्या अपघाती मृत्यूने लाखनगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण झालेला रसिक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने दौंड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.