पुणे : आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ११) संध्याकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचे लग्न झाले आहे.
प्रियंका अभिषेक उमरगेकर (वय- २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापि स्पष्ट होऊ शकले नाही. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाचे लग्न अभिषेक उमरेकर याच्याशी चार महिन्यांपूर्वी झाले होते. रविवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.