अकोला : गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता अकोला शहरातील कौलखेड भागातल्या एका शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कौलखेड भागातल्या एका शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेला कर्मचारी हेमंत चांदेकर याने परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींशी शारीरिक लगट करत विनयभंग केला. हा घडलेला प्रकार विद्यार्थिनींनी शिक्षिका प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितला. शिक्षकांनी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती संचालकांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनला तक्रार दिली.दरम्यान, या प्रकरणी आरोपी हेमंत चांदेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या हर्षाली गजभिये यांनी तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शाळेतही मुली असुरक्षित असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.