भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या खासगी पीएचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत एका बारसमोर रविवारी रात्री घडली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सुरेश भोईर (वय-३० रा. वाशिंद ) असे अपघातात मृत्यू झालेल्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रशांत हे वांशिदमध्ये कुटूंबासह राहून शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे खासगी पीए म्हणून काम करत होते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री तक्रारदार रविंद्र गणपत मडके हे मित्रांसह कारमधून दारू पिण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत आले होते. त्यावेळी मयत प्रशांत हा दोन मित्रांसह दुसऱ्या कारमधून त्याच बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. त्यानंतर पहाटे १ वाजून २० मिनिटाने बार बंद झाला. त्यामुळे तक्रारदार रविंद्र मडके व त्यांचे मित्र आणि प्रशांतसह त्याच्यासोबत असलेले मित्रही बार बंद झाल्याने घरी निघाले.
मात्र, प्रशांत ज्या कारमधून आला होता, त्या कारचालक मित्राने तक्रारदार रविंद्र यांना मोबाईलवर संपर्क करून सांगितले कि, प्रशांत आमच्या कारमध्ये नाही तुम्ही येताना त्याला तुमच्या कारमध्ये घेऊन या. त्यामुळे, मडके यांनी कार पुन्हा बार कडे वळवली असता, मुंबई नाशिक महामार्गावरील स्वागत बार समोर प्रशांत गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ही घटना पाहताच दोन्ही कारमधील मित्रांनी जखमी प्रशांत यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने कार्डिओ रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यायत आले.
दरम्यान, येथील डॉक्टरने तपासून प्रशांतला मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. या घटनेची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रशांत यांचा अपघात
नेमका कसा झाला, हे अद्याप समजू शकले नसून या घटनेनंतर संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार, पोलीस तपास करत आहेत.