(Ahmadnagar News ) अहमदनगर : कोतवाली पोलिस ठाण्याच्या परिसरात मागील काही वर्षांपासून चोरी, अपघातातील पडून असलेल्या १० लाख रुपये किमतीच्या २१ दुचाकी मूळ मालकांना परत दिल्या आहेत. दुचाकी परत मिळाल्याने मूळ मालकांनी कोतवाली पोलिसांचे आभार मानले.
कोतवाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलिस ठाण्यात बर्याच दुचाकी अनेक वर्षांपासून पडून होत्या. ऊन, वारा, पावसामुळे दुचाकींचे नुकसान होत होते. त्यामुळे या दुचाकींचे रेकॉर्ड काढून मूळ मालकांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले होते.
कोतवालीच्या पोलिस कर्मचार्यांनी दुचाकींचे चेचीस नंबर, वाहन क्रमांक यावरून मूळ मालकांचे पत्ते शोधून काढले आणि त्यांना संपर्क केला. मूळ मालकांना दुचाकी घेऊन जाण्यासाठी मंगळवारी (ता. ०४) कोतवाली पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. दुचाकी कोणास न विकणे, दुचाकीत कोणता बदल न करणे, वेळोवेळी पोलिस तसेच न्यायालयाकडून बोलावणे आल्यास हजर राहणे, या सर्व अटींवर दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.
लाखो रुपयांच्या दुचाकी नागरिकांना मिळाल्याने उपस्थितांनी कोतवाली पोलिसांच्या या कामाचे कौतूक करून आभार मानले. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस हवालदार दीपक साबळे, तनवीर शेख, जयश्री सुद्रिक यांनी ही कारवाई केली. त्यासोबतच खाजगी संस्थेचे विजय अवतारी यांचीही मोलाची मदत झाली.
यांना मिळाल्या दुचाकी परत…
अजय बाबुराव विधाते (माडगेमळा, अहमदनगर, मुंजाभाऊ पुंडलिक बोराडे (शिक्रापूर,जि. पुणे) धनंजय कडूबा हजारे (छ.संभाजीनगर) ज्ञानेश्वर अशोक ठोंबरे (हवेली, जि.पुणे), दामोदर घुले (रा.केज,जि.बीड), दीपक वाघमारे (रा.अंबाजोगाइ,बीड), बाबुलाल रज्जाकमिया (नांदेड), मधुकर थोरात (डोंबिवली, मुंबई), सागर जाधव (निमगाव वाघा, नगर) शेख अमीर हमजा (भिंगार), सचिन फुलारे (रा.शिरढोण,अ.नगर), संतोष कुमार ओम नारायण राय (रा.मोचीगल्ली,अ.नगर), सागर बाबासाहेब मुळे, रूपचंद कृष्णा कळमकर (रा.बोल्हेगाव), किरण संतोष गलांडे (रा.पाईपलाईन), विशाल साईनाथ मिरपगार (रा.पवार चाळ), भागवत करंडे (रा.गेवराई, जि.बीड), सुरज शंकर दळवी (रा.निंबोडी) या मूळ मालकांना विविध कंपनीच्या दुचाकी परत करण्यात आल्या.
वृद्धाला आले गहिवरून
दिवसरात्र कष्ट करून मिळालेल्या पैशांतून घेतलेली दुचाकी चोरट्याने लांबविली होती. कोतवाली पोलिसांनी मूळ मालक असलेल्या एका वृद्धाला दुचाकी घेण्यासाठी संपर्क केला होता. दुचाकी ताब्यात मिळाल्यानंतर संबंधित वृद्ध भागवत बाबासाहेब करंडे राहणार रांजणी गेवराई जिल्हा बीड यांना गहिवरून आले होते. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
अहमदनगर येथील सागर बाबासाहेब मुळे म्हणाले, “माझी दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. दीड वर्षानंतर कोतवाली पोलिसांनी माझ्याशी संपर्क करून गाडी घेऊन जाण्यासाठी बोलाविले होते. दुचाकी परत मिळाल्याचा आनंद आहे.
“पुणे येथील अपूर्वा अग्रवाल म्हणाल्या, “माझी दुचाकी पुणे येथून चोरीला गेली होती. कोतवाली पोलिसांनी माझा पत्ता काढून मला दुचाकी घेऊन जाण्यासाठी घेण्यासाठी मला संपर्क केला होता.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime News : माझ्याकडे पण वर्दी म्हणत पोलीस महिलेला मारहाण