पुणे : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून झालेल्या अपघातात गर्भवती पत्नी च्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नादुरुस्त रस्ता व अवजड वाहतूक यामुळे आठ महिन्यापूर्वी प्रेम विवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पहात असलेले एक कुटुंब उधवस्त झाले आहे.
रमेश नवनाथ कानसकर (वय २९, राहणार धोंडकरवाडी , निमदरी ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बसलेल्या संसाराचा आज शेवट झाला. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हळहळला आहे.
काही दिवसांनी गर्भवती महिला आणि तिचा पती दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. स्पीड ब्रेकर असल्यामुळे गर्भवती रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी समोरुन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्यामुळे ती खाली पडली. दुर्दैव म्हणजे तिच्या डोक्यावरुन ट्रॅक्टरचं चाक गेलं त्यातच तिचा मृत्यू झाला.
गर्भवतीचा जागेवरच मृत्यू झाला. आपल्या गरोदर पत्नीचा झालेला भीषण शेवट पतीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. तिचा पती या धक्क्यातून स्वतःला सावरु शकला नव्हता. पत्नीविरहाचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे ही घटना घडली आहे.