पुणे : कोयता गँगने एका तरुणाच्या डोक्यात वार करुन लुटल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील ईगल कॅफे बेलाडोअर सोसायटीच्या गेटजवळ शनिवारी (ता.२८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल जाधव (रा. तळेगाव दाभाडे), ऋषिकेश कुतळ (रा. राजगुरु कॉलनी, तळेगाव), नागेश नायडू (रा. वाघेला पार्क, तळेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी निखिल तानाजी गडकर (वय-३० रा. टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल गडकर ईगल कॅफे बेलाडोअर सोसायटीच्या गेट जवळ थांबले होते. त्यावेळी वरील तीन आरोपी त्या ठिकाणी आले. आरोपी निखिल जाधव याने निखिल यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख अडीच हजार असा एकूण १२ हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.
त्यानंतर आरोपींनी निखिल याला खुर्चीने, पुल टेबलस्टीकने व कोयत्याने मारहाण करुन जखमी करून जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी जाताना हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली.
याप्रकरणी निखिल तानाजी गडकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील तीन जणांच्या विरोधात आयपीसी ३२६, ३९४, ३४, ५०३६, क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगने दहशत माजवली आहे. कोयता गँगवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, कोयता गँगची दहशत अद्यापही कायम आहे.