पुणे : कोयता गँगने मागील काही दिवसांपासून रस्त्यावरील गाड्या व नागरिकांवर खुलेआम कोयत्याने हल्ले करून धुमाकूळ घातला होता. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये कोयता गँगची दहशत निर्माण झाली होती.
तर आता पुण्यात कोयता गँगनंतर बांबू गँग दहशत माजवण्याचा सोमवारी (ता.९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रयत्न करत होती. मात्र पुणेकरांनी या गँगला धो-धो धुतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीबागेत सोमवारी (ता.९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बांबू घेऊन काही जण दहशत माजवत होते. बांबू घेऊन खंडणी मागून लुटण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र या दोघांना स्थानिक दुकानदारांनी पकडून चांगलाच चोप दिला. या गँगमधील एकजण पळून गेला आहे. तर दुसऱ्याला दुकानदारांनी पकडून फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, या बांबू गँग मधील दोन्ही मुले हे अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.