Adv. Gunaratna Sadavarte | मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने मोठा धक्का दिला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. सदावर्ते यांना तब्बल दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. एकूणच सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
या कारवाईमुळे सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांची बाजू मांडत असल्याचे सांगत सदावर्ते यांनी आझाद मैदानावर अनेकदा सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करण्याच्या मागणीसाठी त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते.
वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करुन त्यांची सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ….
वकील गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला येत होते. त्याच दरम्यान ते आपला न्यायालयीन गणवेश अनेकदा परिधान करून येत होते.
वकिलीचा गणवेश परिधान करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाणे. हे बार कौन्सिलच्या नियमाला धरून नाही. इतकेच काय गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते. आणि हीच बार कौन्सिलच्या नियमात बसत नाहीत.
कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई…
गुणरत्न सदावर्ते यांचे आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आजाद मैदानावरील संपात सहभागी होत असताना वकिलीचा गणवेश घालून तिथे केलेला डान्स वकील गुणरत्न सदावर्ते यांना चांगलाच भोवला असून दोन वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाहीये.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Bhigwan News : युवक जिल्हाध्यक्ष पदी सचिन आढाव यांची नियुक्ती
Bhigwan News : हरवलेले तब्बल ६ लाखांचे ३२ मोबाईल भिगवण पोलिसांनी केले परत..!
Satara News : वडूज नगरीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध आंदोलन