विशाल कदम
लोणी काळभोर, ता.१२ : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कुशल वाटिका या वसाहतीतील एका सदनिकेला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच सुट्टीवर असतानाही कर्तव्याची जाणीव ठेवून बाबासाहेब चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलेली आग विझवून कर्तव्य पार पाडले. त्यामुळे ते खरे हिरो ठरले आहेत. चव्हाण यांच्या या कामगिरीमुळे लोणी काळभोरसह पुणे जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबासाहेब भागवत चव्हाण (वय-४१, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आग विझविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाचे नाव आहे. तर विजय ढाकणे (रा. A – २०४, कुशल वाटिका, लोणी काळभोर) असे आग लागलेल्या सदनिका मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय ढाकणे हे हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून काम करतात. ढाकणे यांच्या पत्नीचा शुक्रवारी (ता.११) वाढदिवस होता. त्यामुळे ढाकणे यांच्या पत्नी व मुलगा बाहेर जेवणासाठी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेले होते. तर पोलीस अंमलदार विजय ढाकणे हे रात्री ९ वाजता हडपसर पोलीस ठाण्यात कामावर गेले होते.
दरम्यान, विजय ढाकणे यांच्या सदनिकेला शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागल्याने वसाहतीतीत एकच गोंधळ उडाला होता. या आगीची माहिती समजतात उमेश काटवटे यांनी तातडीने त्यांच्या परिचयाचे असलेले फायरमन बाबासाहेब चव्हाण यांना कळविले. काही नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली.
या घटनेची माहिती मिळताच, बाबासाहेब चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाकातोंडाला रुमाल बांधला. व सदनिकेमध्ये भरलेली गॅसची टाकी सर्वात प्रथम बाहेर काढली. त्यानंतर सोसायटीच्या फायर सिस्टीम फस्टेड लाईनच्या माध्यमातून पाणी मारून सदनिकेची आग विझविली. यासाठी बाबासाहेब चव्हाण यांना विशाल चौधरी व धनंजय कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले. तर अमोल चिकणे या दाम्पत्याने सोसायटीतील नागरिकांना तातडीने आगीची माहिती दिली. सर्व नागरिकांना खाली बोलावून घेतले. या आगीत घराच्या फर्निचर जळून खाक झाला आहे.
आगीच्या ठिकाणी वाघोली येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची व हडपसर येथील पुणे महानगर पालिकेची अग्निशमनच्या गाड्या आल्या होत्या. परंतु, मदत पोहोचण्यापूर्वीच बाबासाहेब चव्हाण यांनी ती आग विझविली होती. त्यानंतर अग्निशामक दलाचे अग्निशमन विमोचक मयूर गोसावी, तांडेल संजय जाधव, फायरमन संतोष मोटे, उमेश शिरसाट, भास्कर घुले, महेश पाटील, अक्षय नेवसे, संदीप तांबे, वाहन चालक संदिप शेळके व चंद्रकांत जगताप यांनी कुलिंगचे काम केले केले.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस नाईक महावीर कुटे, पोलीस हवालदार अजिंक्य जोजारे, ईश्वर भगत, बालाजी बांगर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना सोसायटीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही आग कशाने लागली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे.
जवान बाबासाहेब चव्हाण यांचे होतंय कौतुक
आगीची माहिती मिळताच, सुट्टी असतानाही कर्तव्याप्रती बाबासाहेब चव्हाण त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना धीर दिला. सुरक्षेची कोणतीही साधने नसतानाही घरात प्रवेश केला आणि आग विझविण्यात यश मिळवून खूप मोठी दुर्घटना टळली. यामुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कर्त्याव्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणारे अग्निशामक जवान बाबासाहेब चव्हाण यांचे कौतुक होत आहे.
आग विझवण्यासाठी नागरिकांचीही मदत
याबाबत बोलताना बाबासाहेब चव्हाण म्हणाले की, कर्तव्य बजावून घरी आलो होतो. घरी आराम करत असताना, अचानक माझे मित्र उमेश काटवटे यांनी आगीची माहिती दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालो. प्रसंगावधान दाखवून घरात शिरलो. नागरिकांच्या मदतीने आग विझविली. घरामधील गॅस सिलिंडर बाहेर काढून दिला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.