पुणे : कंपनीचे सोलर पॅनेलचे मीटर बसविण्यासाठी व तपासणी अहवाल पाठविण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारताना चिंचवड महावितरण चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.२३) रंगेहाथ पकडले आहे.
बाबुराव विठोबा हंकारे (वय ५१ , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वर्ग-१, महावितरण चाचणी विभाग कार्यालय, चिंचवड, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीचे सोलर पॅनेलचे मीटर बसविण्यासाठी व तपासणी अहवाल पाठविण्यासाठी लोकसेवक आरोपी बाबुराव हंकारे यांनी ४० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. आणि तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिंचवड महावितरण चाचणी विभागाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हंकारे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.