पुणे : कोथरूड परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर येनपुरे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये) अंतर्गत कारवाई केली आहे. गेल्या दीड वर्षात शहर परिसरातील १०४ गुंड टोळ्यांच्या विरोधात पोलिस आयुक्तांच्या आदेशाने मोक्का कारवाई करण्यात आली आहे
येनपुरे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. येनपुरे टोळीच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर आरोपींच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला.
सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे, सुरेश कालिदास वाजे, साहिल विनायक जगताप, अक्षय दामू वाळुंज आणि वैभव ऊर्फ भोऱ्या प्रदीप जगताप (सर्व रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरूड) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. येनपुरे, त्याचे साथीदार, जगताप, वाळुंज, वाजे यांनी पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात दहशत माजविली होती.
दरम्यान, आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईचा हा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस आयुक्तांनी येनपुरे टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.