बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील नीरावागज-मळद रस्त्यावर प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून वाहनांसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १२ मार्च रोजी पहाटे पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपी गणेश दत्तात्रेय मदने, (वय ३०) रा. मळद (ता. बारामती, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी सकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास निरावागज ते मळद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आरोपी मदने हा गुटखा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे राठोड यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईत ४ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यात ६० पिवळसर रंगाचे गुलाम गुटख्याचे पुडे, ९८ हजार रुपये किमतीची १४ फिकट हिरव्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यात ५० पांढऱ्या रंगाचे सितार गुटख्याचे पुडे, तसेच ५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा महीन्द्रा कंपनीची गाडी जप्त करण्यात आली.
तर दुसऱ्या वाहनात १० लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीची १०६ पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यात ६० पिवळसर रंगाचे गुलाम गुटख्याचे पुडे, ५ लाख रुपये किमतीची एक फिकट पिवळ्या रंगाची अशोक लेलंट कंपनीचे वाहन जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक अधिसूचनांच्या आदेशाचे उल्लंघन करुन आरोपीने १६ लाखांचा गुटखा आणि वाहने असे एकुण २६ लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार वैभव साळवे, आप्पाजी दराडे, दत्ता गवळी, राहुल लाळगे यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर अधिक तपास करीत आहेत.