पुणे : गणेशोत्सव काळात पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हेगारी वर्चस्वासाठी टोळी युद्ध करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. झोन पाचमधील पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील २५५ सराईत गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए व हद्दपारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मिळआलेल्या महितीनुसार, झोन पाचमधील पोलीस ठाण्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यास करुन मोक्का, तडीपारी आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०२३ ते आजपर्यंत दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७ तर बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्दपार) कलम ५५ नुसार हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत १६ सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यावर कारवाई करुन ८८ आरोपींना अटक केली आहे. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत १२ आरोपींना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ९२ आरोपींना पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. झोन पाचमधील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एकूण २५५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई यापुढे देखील सुरु राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.