अमरावती : रस्ता ओलांडत असताना अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना दुचाकी चालकाने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अमरावती शहरातील कठोरा रोड परीसरात ते चालत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. हा अपघात सकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बच्चू कडू हे डिव्हायडरच्या दिशेने फेकले गेले.
दरम्यान, अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.