पुणे : पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला पकडल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवलयं असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला.तातडीने पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचला.पण फोन करणाऱ्याने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे उघड झाले.या प्रकरणी पुणे येथील नांदेड सिटी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबीयांसोबतच गुन्हेगारी कृत्यामध्ये तितकाच सामील असलेला निलेश चव्हाण गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र निलेश चव्हाण याची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल, या हेतूने त्याने 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन केल्याची माहिती आहे. संतोष दत्तात्रय गायकवाड (वय 33 वर्ष) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान फोन करणाऱ्या आरोपीने आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याला पकडून ठेवलं आहे. त्याच्या जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करुन गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. मात्र ही माहिती खोटी असल्याचं उघड झालं.







