पुणे : अंगात कणकण आल्याने उपचारांसाठी रुग्णालयात गेलेल्या तरुणाला डॉक्टारांनी इंजेक्शन दिले. त्यानंतर मात्र तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना खडकीतील जुना बाजार येथून उघडकीस आली आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे तरुणाने जीव गमवावा लागल्याने खडकी पोलीस स्टेशनमध्ये दोन डॉक्टर व एका परिचारिकेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉ. खालीद सय्यद (वय. ५०, रा. बोपोडी), डॉ. आयेशा सय्यद (वय. ४६) आणि परिचारिका सुनिता गडपल्लु (वय ४८,रा. खडकी बाजार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अतुल तुपसौंदर्य (वय. २६, रा. खडकी बाजार) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकणी कविता अतुल तुपसौंदर्य (वय. २५, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हा प्रकार खडकीतील डॉ. सय्यद हॉस्पिटलमध्ये २० सप्टेंबर २०२१ मध्ये सायंकाळी घडला होता. त्यानंतर आता तब्बल सव्वा वर्षानंतर तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अतुल तुपसौंदर्य यांना (२० सप्टेबर २०२१ ) रोजी अंगात कणकण वाटत होती. त्यामुळे ते सायंकाळी खडकीतील जुना बाजार येथील डॉ. सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले. तेथे डॉ. खालीद व डॉ. आयेशा यांनी त्यांच्या कमरेवर उजव्या बाजूला इंजेक्शन दिले. या चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्या जागी इन्फेक्शन होऊन गाठ झाली.
त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना (२४ सप्टेबर २०२१ रोजी त्यांचा मृत्यु झाला) याबाबत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अतुल यांचा मृत्यु झाल्याची तक्रार करण्यात आल्याने ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती नेमण्यात आली होती. तिचा अहवाल तब्बल सव्वा वर्षानंतर प्राप्त झाला. त्यानुसार डॉक्टरांसह परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.