हडपसर : हडपसर येथून दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाची मित्रांनी कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार संशयितांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
गणेश नाना मुळे (रा-सदर सातववाडी हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी गणेशचे वडील नाना तात्याराम मुळे (वय-४५, धंदा ड्रायव्हर. रा.स.नं.१९६ संकेत विहार लेन नं.१२ निअर रेल्वे बिल्डींग फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहण राजेंद्र गायकवाड, योगेश मिलारे, अक्षय गंगावणे आणि चेतन कुदळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाना मुळे यांचा मुलगा गणेश याला त्याचे मित्र संशयित चारही आरोपी हे शनिवारी (ता.१० डिसेंबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर वरील चारही संशयितांनी गणेशला अज्ञात कारणासाठी बंदुकीतून गोळी झाडुन खुन केला. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह बोपदेव घाटामध्ये फेकुन दिली, असा संशय फिर्यादी नाना मुळे यांना आला आहे.
दरम्यान, नाना मुळे यांना संशय आल्याने त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चारही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सी सी थोरबोले करत आहेत.