पुणे : अज्ञात आरोपीने मैत्रिणीचे अपहरण केले. या मुलीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन चार अनोळखी व्यक्तींनी एका २२ वर्षांच्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. धायरी ब्रिजवर कचरा डेपोजवळ शनिवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन दुचाकीवरील अज्ञात चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अर्जुन रंगराव राठोड (वय २२, रा. रायकर मळा, पुणे) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन राठोड याच्या मैत्रिणीला ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन एका अज्ञात आरोपीने अपहरण करुन पळवून नेले.
दरम्यान, अर्जुन राठोड कॅनॉल रोडवरील कचरा डेपोजवळून पायी चालत जात होता. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरून त्यांनी अर्जुनला अडवले. ‘मुलगी कोठे आहे सांग, अन्यथा मारुन टाकीन,’ अशी धमकी देऊन लाकडी बांबूने बेदम मारहाण केली.