पुणे : एका तरुणावर शस्त्राने वार करुन त्याच्याकडील १८ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना महापालिका भवन परिसरात घडली. पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय गणेश शिंदे (वय २३,रा. महादेव मंदिराजवळ, डेक्कन जिमखाना) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकणी राम खटका (वय २३, रा. चतु:शृंगी) तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि त्याचा मित्र महापालिका भवन परिसरात शुक्रवार (ता. १८) रात्री साडेअकराच्या सुमारास गप्पा मारत थांबले होते.
त्या वेळी आरोपी अक्षय शिंदे आणि साथीदार तेथे आले. खटका याच्या हातावर शस्त्राने वार करुन चोरट्यांनी खिशातील १८ हजार रुपये, डेबिट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड असा मुद्देमाल हिसकावून घेतला आणि तेथून फरार झाले.
दरम्यान, राम खटका यांनी शिवाजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.