पुणे : क्रेडिट कार्ड बिलाबाबत ऑनलाईन तक्रार ट्विटरवर केली असता टीम व्हिव्हर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून लोणी काळभोर येथील तरुणाला सायबर चोरट्यांनी ८९ हजार ६५० रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर येथील ३४ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांचे क्रेडिट कार्डचे बिल मिळाले. ते त्यांना अधिक वाटल्याने त्यांनी त्याची तक्रार ट्वीटरवर एचडीएफसी बँकेकडे केली. परंतु, ते ट्वीटर खाते बनावट होते. त्यानंतर त्यांना हेल्पलाईनला संपर्क करण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर फिर्यादी यांनाते खरे वाटल्याने त्यांनी संपर्क साधला असताना त्यांना बँकेकडून लागलेले एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन देतो, असे सांगून टीम व्हिव्हर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अॅप डाऊनलोड केल्यावर त्यांच्या खात्यातून ८९ हजार ६५० रुपये काढण्यात आले.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले असता त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.